spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वनविभागाचे अधिकारी ठरले ‘देवदूत’! रात्रभर वाघाच्या छायेत असलेल्या गुराख्याला जीवदान; गुडरी गावात आनंदाचे वातावरण

हंसराज,भंडारा सिहोरा :- सिहोरा व गोबरवाही पोलीस स्टेशनच्या सीमेवर असलेल्या गुडरी येथील बेपत्ता झालेला गुराखी सुरचंद कोठू पारधी हा वनविभागाच्या सातत्यपूर्ण शोधमोहिमेमुळे अखेर सुखरूप घरी परतला आहे. ज्या भागात हा गुराखी रात्रभर अडकला होता, त्याच भागात वाघाचे लोकेशन असल्याने तो अक्षरशः वाघाच्या जबड्यातून बचावल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय? गुडरी येथील रहिवासी सुरचंद पारधी हे २० ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. जंगलात हिंस्त्र श्वापदांचा वावर असल्याने घातपाताची भीती व्यक्त केली जात होती.

रात्रभर शोधमोहीम घटनेची माहिती मिळताच तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले यांनी तातडीने सूत्रे हलविली. २० ऑगस्टच्या रात्री ८ वाजेपासूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रात्रगस्त सुरू केली. संपूर्ण नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र पिंजून काढले, मात्र रात्रीच्या अंधारात सुरचंद यांचा पत्ता लागला नाही.

सकाळी ६ वाजता मिळाले यश दुसऱ्या दिवशी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपासून पुन्हा नव्या जोमाने शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, जंगल शिवारातच सुरचंद पारधी हे वनकर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांची विचारपूस करून ओळख पटल्यानंतर, वनविभागाच्या वाहनाने त्यांना पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. आपल्या माणसाला सुखरूप पाहून पारधी कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

वाघाच्या जबड्यातून बचाव मिळालेल्या माहितीनुसार, सुरचंद पारधी यांनी ज्या परिसरात रात्र काढली, तिथेच वाघाचा वावर असल्याचे संकेत मिळाले होते. अशा धोकादायक परिस्थितीतही ते सुखरूप राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या मोहिमेत गुडरीचे पोलीस पाटील एस. एस. मेश्राम, ग्रामपंचायतीचे सरपंच, तुमसर व नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वनविभागाचे आवाहन वनविभागाच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव वाचल्याने प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. दरम्यान, वन्यजीवांच्या उपस्थितीमुळे घाबरून न जाता, जंगलात जाताना वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.