कामठी :- कळमना रोडवरील सिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. तन्जीम आजमी वल्द अल्ताफुर रहीम (वय ४६) यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी गुलाम नजर वल्द शेख मोहम्मद (वय २७, रा. कादर झेंडा, कामठी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(३), ३०८(४), ३५२ व ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मात्र, सोमवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरोपीची सुटका करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, गुलाम नजर हा १८ जून रोजी पोटदुखी व शौचास त्रास होत असल्याने पत्नीसह सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. त्याच्याकडे त्या वेळी आयुष्मान कार्ड नसतानाही डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. तपासणी, सिटी स्कॅन व आवश्यक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्याचे आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या उपचाराच्या प्रकरणावरून गुलाम नजर याने सोशल मीडियावर रील प्रसारित करून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १७ दिवस रुग्णालयात दाखल नसतानाही ४० हजार रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात आले. या व्हिडिओची कामठी परिसरात चर्चा सुरू असतानाच डॉक्टर आणि गुलाम नजर यांच्यात चर्चा होऊन गैरसमज दूर झाल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित झाला.
मात्र, त्यानंतर पुन्हा सोशल मीडिया चॅनेलवरून हॉस्पिटल व डॉक्टरांविरोधात आरोप करणारा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. २१ ऑगस्टच्या रात्री सुमारे ८.४८ वाजता त्यांच्या परिचित फकीरुर रहमान याने डॉक्टरांना बदनामीकारक व्हिडिओ पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे.
व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर डॉक्टरांनी गुलाम नजरशी संपर्क साधला. त्यानंतर रात्री सुमारे दोन वाजता तो काही व्यक्तींसह हॉस्पिटलमध्ये आला. उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर तो तेथून निघून गेला. या चर्चेनंतर डॉक्टरांविरोधात केलेले आरोप चुकीचे असल्याचे मान्य करणारा व्हिडिओही केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, २२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दोन वाजता गुलाम नजर पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला आणि सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करून हॉस्पिटलला बदनाम करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी केली, असा डॉक्टरांचा आरोप आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत ‘पैसे दिले नाही तर जीव घेऊ’ अशा स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. चाकूचा उल्लेख करून धमकावल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुलाम नजर याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणाला वेगळे वळण देणारी सोशल मीडिया पोस्टही समोर आली. गुलाम नजर याला त्याच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने नेऊन अपहरण केल्याचा दावा करणारी रील सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू झालेल्या या वादाचे प्रकरण अखेर पोलिस आणि न्यायालयापर्यंत पोहोचले.
न्यायालयातील युक्तिवादानंतर आरोपीची सुटका…..
गुलाम नजर याला सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालय परिसरात तक्रारदाराकडूनही मोठी गर्दी दिसून आली. तक्रारदाराच्या वतीने आरोपीला सुटका देऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला. तर आरोपीचे वकील ॲड. राहुल वाघमारे यांनी तब्बल तासाभराहून अधिक काळ युक्तिवाद करत संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. प्रथम वर्ग न्यायाधीश एम. आर. कामत यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीची सुटका केली तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
दरम्यान, डॉक्टरांनी केलेले खंडणीचे आरोप, सोशल मीडियावर प्रसारित झालेले व्हिडिओ, रुग्णालयातील उपचार व बिलासंदर्भातील दावे तसेच गुलाम नजरच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेले अपहरणाचे आरोप यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, तपासातून या संपूर्ण प्रकरणामागील नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.





