spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ भरदिवसा घरफोडी; ६७ हजारांचा मुद्देमाल लंपास

– सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३७ हजारांची रोकड चोरी

कामठी :- राज्याचे महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जयस्तंभ चौक कामठी येथिल जनसंपर्क कार्यालय जवळील मते कुटुंबियांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैल बाजार, जयस्तंभ चौकाजवळ राहणाऱ्या शोभा मोहन मते (वय ६५) यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. मते कुटुंबीय काही दिवसांसाठी बाहेर गेले असताना घर बंद होते. २१ ऑगस्ट ते २४ ऑगस्टदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील कपाटांचे कुलूप व कोंडे तोडले. कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याची अंगठी, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या पायापट्ट्या, चांदीच्या अंगठ्या व अन्य दागिन्यांसह ३७ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेले.

घरात परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शोभा मते यांनी जुनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी जुनी कामठी पोलिसानी अज्ञात चोरटयाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अभय भाऊराव मून करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.