– तुकाराम मुंढेंनी मुंबई क्रिकेटकडे मोर्चा वळवला
मुंबई :- मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अन्नपदार्थांच्या दुकानांपासून रेस्टॉरंट्सपर्यंत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील परिसरातही एफडीएने मोठी कारवाई केली आहे.
एफडीएने एमसीएच्या परिसरात सुरू असलेल्या पाच खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सचे फूड लायसन्स आणि रजिस्ट्रेशन निलंबित केले आहे. या पाचही आउटलेट्समध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक त्रुटी आढळून आल्या. त्याचबरोबर ज्या संस्थेच्या नावावर खाद्य व्यवसायाचे परवाने जारी करण्यात आले होते, प्रत्यक्षात त्या आउटलेट्सचे संचालन दुसरीच कंपनी करत असल्याचे तपासात समोर आले.
कोणत्या आउटलेट्सवर कारवाई?
FDAने एमसीएच्या परिसरातील परमिट रूम, पॅव्हिलियन, मेडिटेरेनियन, ओरिएंटल स्विंग आणि क्लब अँड पेस्ट्री काउंटर या पाच आउटलेट्सवर कारवाई केली आहे. FDAच्या अधिकाऱ्यांनी या सर्व आउटलेट्सची 20 ऑगस्ट रोजी तपासणी केली. तपासणीनंतर अवघ्या एका दिवसात म्हणजे 21 ऑगस्ट रोजी परवाने आणि रजिस्ट्रेशन निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
परवाने एमसीएच्या नावावर, व्यवसाय दुसऱ्याच कंपनीचा?
या कारवाईमागील प्रमुख कारण म्हणजे खाद्य व्यवसायाच्या परवान्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन. एमसीएला अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत चार रेस्टॉरंट्ससाठी स्वतंत्र चार परवाने आणि एका स्नॅक काउंटरसाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्यात आले होते.
मात्र, FDAच्या तपासणीत दुसरी कंपनी या ठिकाणी खाद्य व्यवसाय चालवत असल्याचे आढळले. विशेष म्हणजे या कंपनीच्या नावावर संबंधित खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून परवानगीशिवाय खाद्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने FDAने MCAच्या नावावर जारी केलेले चार फूड लायसन्स आणि एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तत्काळ प्रभावाने निलंबित केले.
स्वच्छतेच्या नियमांचाही फज्जा
केवळ परवान्याशी संबंधित अनियमितताच नाही, तर तपासणीदरम्यान आउटलेट्समध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याचे आढळले. FDAच्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा आणि मानके विनियम, 2011 मधील अनुसूची 4, भाग 2 अंतर्गत येणाऱ्या अनेक नियमांचे पालन केले जात नव्हते.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे खळबळ
महाराष्ट्र FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रसिद्ध संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांमध्येही नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. MCAच्या परिसरातील पाच आउटलेट्सवर झालेली ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग मानली जात आहे. परवाना ज्या नावावर आहे, त्याच नावाने आणि नियमांनुसार खाद्य व्यवसाय चालवणे तसेच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे सर्व निकष पाळणे बंधनकारक आहे, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला आहे.





