नाशिक :- साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र श्री सप्तशृंगी गड येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. आता येथील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरमाचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘कुंभमेळा 2027’ च्या पार्श्वभूमीवर हे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबरपासून पुढील 17 दिवस सप्तशृंगीगड ते नांदुरी या मागावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कशिरा संख्ये यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
आगामी कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या काळात सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी राहील. त्यामुळे सप्तशृंगी गड ते नांदुरी या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. 10 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरदरम्यान 17 दिवस हे काम सुरू राहील.
सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एकमेव घाटरस्त्याचे काम सुरू राहणार असल्याने हा रस्ता 17 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. प्रत्यक्ष घाटमार्गात काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवण्यास काम पूर्ण क्षमतेने सुरू करणे अशक्य ठरते. तसेच या मार्गावर कोणीतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी 17 दिवस पूर्ण रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सर्व संबंधित यंत्रणा, वाहनचालक आणि भाविकांनी या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी कश्मीरा संखे यांनी केले आहे.





