spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्चावर उधळपट्टी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे उद्धव – राज यांना आवाहन

मुंबई :- दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात सरकारने आजच त्यांना कर्जमाफीचा तिसरा हप्ताही दिला आहे. आगामी काळातही सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. मात्र महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असतानाही मुंबईत चार तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने होणारी कोट्यवधींची उधळपट्टी टाळत ती मदत मराठवाडा – विदर्भातील आमच्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करा, असे आवाहन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी उद्धव आणि राज ठाकरे यांना केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील शेतकरी संकटात असतानाही तुम्ही मोर्चा काढला असा इतिहास तुमच्या नावावर नोंदवला जाईल. त्यामुळे मुंबईत मोर्चा काढून नौटंकी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली तर अधिक बरे होईल. उद्धव ठाकरे यांनी कधी संवेदनशीलता दाखवली नाही. मात्र राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहे की किमान या दुष्काळाच्या काळात तरी ते प्रचंड खर्च करत मोर्चा काढणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी उबाठा गट आणि मनसेला कधीही माफ करणार नाही, ते कधीही तुम्हाला मतदान करणार नाहीत, असे बन यांनी सुनावले.

इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार असल्यासंदर्भात बोलताना बन म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही बैठकांना व्हिसीद्वारे उपस्थित असायचे. कारण त्यांना वर्क फ्रॉम होमची सवय आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम नांगर आणता येईल का? वर्क फ्रॉम होम पेरणी करता येईल का? अशी संकल्पना ते मांडत होते. म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना घरी बसवत वर्क फ्रॉम होमच काम करा, असे बजावले. आताचा मोर्चाही त्यांनी असेच घरी बसून ऑनलाईन पद्धतीने काढावा. तुमचे लाखो समर्थक त्या ऑनलाईन मोर्चात सहभागी होतील. किमान त्यातून वाचलेले पैसे तरी आमच्या शेतकऱ्यांना द्या, असे बन म्हणाले.

सरकार कर्ज काढेल पण शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहील, असे ठामपणे सांगत बन म्हणाले, कर्ज काढण्यात काहीच चुकीचे नाही. याआधीही सरकारने वेळोवेळी कर्ज काढलेली आहेत. शेतकरी संकटात असताना आम्ही हातावर हात धरून बसलेलो नाही. आवश्यकता असेल तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची परंपरा उबाठा गटाची होती तर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची परंपरा महायुतीची आणि देवाभाऊंची आहे. म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचे आणि देवाभाऊंचे आहे. तुमच्यासारखे रोज शंभर कोटी रुपये वसुली आणि मातोश्री 2 बांधायची आमची परंपरा नाही.

विधानसभा निवडणुकीवेळी ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त नव्हते हे राऊतांना माहिती नाही का?

तुम्हाला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढायचे असेल तर अजून निवडणुकीला तीन वर्षे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 25 वर्षापासून सत्तेत आहेत ते निवडणूक आयोगाच्या नव्हे तर सर्वसामान्य देशवासियांच्या जीवावर. ज्ञानेश कुमारांबद्दल आक्षेप असेल तर 2024 ला विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ते निवडणूक आयुक्तच नव्हते, हे संजय राऊत यांना माहिती आहे का? आम्ही लोकांची सेवा करतो. लोकांमध्ये जातो. उद्या आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची भरघोस घोषणा करणार आहोत म्हणून लोक आम्हाला निवडून देतात. तुमच्यासारखे घर बसा कारभार करणारे आम्ही नाहीत, अशी खरमरीत टीका बन यांनी केली.

Popular Articles