– गांधी जयंतीनिमित्त कामठीच्या गांधी भवनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून माल्यार्पण
कामठी :- राष्ट्रपिता “महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला. समाजात बंधुभाव, एकता आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी गांधीजींचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यासोबतच ते आपल्या आचरणात आणणे हीच राष्ट्रपित्याला खरी आदरांजली ठरेल,” अशी भावना कामठी नगरपरिषदेचे गटनेते काशिनाथ प्रधान यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कामठी येथील गांधी भवन, काँग्रेस कमिटी येथे आयोजित माल्यार्पण सभेत ते बोलत होते. यावेळी काशिनाथ प्रधान यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगर काँग्रेस कमिटी कामठीचे अध्यक्ष धीरज यादव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रपित्याच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, बंधुभाव आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनसमर्थन मिळाले आणि जगभरातील अनेकांना शांततामय मार्गाने परिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळाली. आजच्या काळातही समाजातील मतभेद दूर करून परस्पर आदर, एकता आणि शांतता जपण्यासाठी गांधीविचारांची आवश्यकता असल्याचे मत कामठी शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कामठी नगर परिषद चे स्वीकृत नगरसेवक धीरज यादव यांनी समयोचीतव्यक्तव्य केले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे सचिव व माजी नगरसेवक नीरज लोणारे, माजी उपाध्यक्ष व नगरसेवक अहफाज अहमद, कामठी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष कृष्णाजी यादव, सोनेगाव ग्रा प चे माजी सरपंच चंद्रकांत हेवट,नगरसेवक अनिल सूर्यवंशी, नगरसेवक शाकिब अन्सारी, नगरसेविका सातिका खांडेकर, राजेश कांबळे, अलंकार गजभिये,मीर आरिफ अली, त्रिभुवन भिवगडे, माजी नगरसेविका ममता कांबळे, सत्यफुला खोब्रागडे, संध्या कांबळे आणि परविन खान यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








