spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महावितरणच्या ‘सेवा सेतू’ अभियानास आरईसी अधिकाऱ्यांची भेट; ‘स्मार्ट’ रूफटॉप योजनेच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

नागपूर :- नागपूर शहरातील वीज ग्राहकांच्या समस्यांचे जागेवरच निवारण करणाऱ्या महावितरणच्या विशेष ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाला नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महावितरणच्या या अत्यंत यशस्वी उपक्रमाची पाहणी करण्यासाठी तसेच ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजने’च्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ‘आरईसी’ (Rural Electrification Corporation Ltd.) चे वरिष्ठ अधिकारी अक्षय साळी यांनी नागपुरातील विविध सेवा सेतू शिबिरांना विशेष भेट दिली.

आपल्या या व्यापक पाहणी दौऱ्यादरम्यान अक्षय साळी यांनी शहरातील त्रिमूर्ती नगर चौक, दाभा चौक, नागपूर तहसील कार्यालय परिसर आणि डीप्टी सिग्नल या चार प्रमुख ठिकाणी आयोजित शिबिरांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी त्यांनी तेथील प्रशासकीय कामकाज, ग्राहकांच्या तक्रार निवारणाचा वेग आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांना प्रत्यक्ष मिळणारा लाभ या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

शिबिरांच्या ठिकाणी भेट देताना अक्षय साळी यांनी उपस्थित वीज ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व मिळणाऱ्या सेवांबाबत थेट अभिप्राय जाणून घेतले. ‘सेवा सेतू’ अभियानांतर्गत वीज बिलांमधील दुरुस्ती, नवीन वीज जोडणी, नाव बदल, तसेच स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जा योजनांसंदर्भात येणाऱ्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून त्यांचा वेळेत निपटारा केला जात असल्याचे पाहून त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.

‘स्मार्ट’ आणि सौर ऊर्जा योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने, पारदर्शकतेने आणि सुलभतेने व्हावी, यासाठी त्यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक प्रोत्साहन देत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. ” महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेले सेवा सेतू अभियान हे ग्राहक केंद्रित प्रशासनाचा आणि गतिमान ग्राहकसेवेचा एक उत्तम वस्तुपाठ आहे. यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचे प्रश्न आणि समस्या जागेवरच सुटून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे,” असल्याची भावना. अक्षय साळी यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी महावितरणच्या नागपूर शहर मंडळाच्या (Circle) कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रीती फुले यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles