spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ऑफ्रोहच्या राज्याध्यक्षपदी डॉ. दीपक केदार

– नरेंद्र निमजे महासचिव; २०२७ ते २०२९ साठी नवीन राज्य कार्यकारिणीची निवड

अमरावती :- ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) महाराष्ट्रच्या अमरावती येथे झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनात २०२७ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. राज्याध्यक्षपदी अमरावतीचे डॉ.दीपक केदार, तर महासचिवपदी नागपूरचे नरेंद्र निमजे यांची निवड करण्यात आली. आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती अॅड. प्रितीताई हर्षल रेवणे, माजी राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर आणि विद्यमान राज्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांची प्रमुख उपस्थिती होती. आदिवासींच्या संवैधानिक हक्कांसाठी ऑफ्रोहच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याला सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार तायडे यांनी दिले. अॅड. रेवणे यांनीही अन्यायग्रस्त आदिवासींच्या शैक्षणिक व न्यायिक हक्कांच्या संरक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. नवीन कार्यकारिणीत राज्य कार्याध्यक्षपदी सोलापूरचे सुधाकर सुसलादी, कोषाध्यक्षपदी अमरावतीचे मनीष पंचगाम यांची निवड झाली. महिला आघाडीच्या राज्याध्यक्षपदी मुंबईच्या प्रिया खापरे, महासचिवपदी पुण्याच्या वनिता नंदनवार, कार्याध्यक्षपदी सातारच्या भारती धुमाळ आणि कोषाध्यक्षपदी बुलढाण्याच्या पुष्पाताई कोळी यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित राज्याध्यक्ष डॉ. दीपक केदार हे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील वर्ग-१ अधिकारी असून लेखा व कोषागार संचालनालयाच्या सहसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. विविध प्रशासकीय पदांवर त्यांनी काम केले असून विद्यार्थी दशेपासूनच त्यांना साहित्य व पत्रकारितेची आवड आहे. त्यांनी आदिवासी समाजाचे मुखपत्र ‘आदिम’ या मासिकाचे संपादक म्हणूनही काम केले आहे. अधिवेशनाला नागपूर जिल्ह्यातून विभागीय अध्यक्ष प्रेमदास नंदनवार, जिल्हाध्यक्ष दामोदर खडगी, जिल्हा सचिव नरेंद्र निमजे, कोषाध्यक्ष प्रवीण मदनकर, उपाध्यक्ष मधू पराड, महिला आघाडीच्या सचिव वैशाली कुंभारे यांच्यासह पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. दीपक केदार यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Popular Articles