spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली देशात प्रथम

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

गडचिरोली :- नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कृषी व जलसंपदा या क्षेत्रातही जिल्ह्याने देशातील प्रथम स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनासह या प्रयत्नांमध्ये सहभागी सर्व घटकांचे कौतुक केले आहे. तसेच सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

आकांक्षित जिल्हे कार्यक्रमातील आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या पाच प्रमुख क्षेत्रांतील एकूण ४८ निर्देशांकांमध्ये निर्धारित कालावधीत झालेल्या सुधारणांच्या आधारे डेल्टा रँकिंग निश्चित केले जाते. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोलीने प्रथम, तर जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात विविध विभागांनी समन्वयाने केलेल्या प्रयत्नांमुळे विकासाच्या निर्देशांकांमध्ये सुधारणा साधण्यात आली आहे. विशेषतः कृषी व जलसंपदा क्षेत्रातील कामगिरीमुळे जिल्ह्याला या क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थान मिळाले आहे.

राज्य शासनाची जिल्ह्यातील यंत्रणा आणि जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा यांनी आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात एक संघ म्हणून काम करून या निर्देशांकांमध्ये सुधारणा साधल्या आहेत. या सांघिक प्रयत्नांबद्दल सर्वांचे विशेष अभिनंदन करीत, हे यश पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केली आहे.

विकासातील तफावत कमी करणे, तळागाळातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि सर्वसमावेशक व शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नीती आयोगाने कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचे कौतुक केले आहे.

गडचिरोलीच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे. सर्वांच्या सहकार्याने विकासाचे पुढील टप्पेही साध्य होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Popular Articles