– वन्यजीव सप्ताह उपक्रम
बेला :- वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने बेला जवळच्या चारगाव कार्यक्षेत्रातील जामगड येथे पशुधनातील लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पशुधनाचे आरोग्य व वन्यजीवांचे संरक्षण यांचा समन्वय साधत या उपक्रमाद्वारे पशुपालक व ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली.
यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉ. पवन भागवत यांनी पशुपालक शेतकरी व ग्रामस्थांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, रोगाची प्रमुख लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, पशुधनाची घ्यावयाची काळजी तसेच वेळेवर लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
वनपाल सचिन ताकसांडे (राउंड ऑफिसर, खापरी राउंड) यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व, वन्यजीव संवर्धन व संरक्षण तसेच मानव-वन्यजीव सहअस्तित्वाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
लम्पी चर्मरोगाचा प्रभावी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जामगड परिसरातील पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. पशुपालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या पशुधनाच्या आरोग्याबाबत जागरूकता दाखविली.
या उपक्रमास डॉ. पवन भागवत, सचिन ताकसांडे, वनपाल, सोनम उमाटे, वनरक्षक जामगड, चेतन उमाटे, वनरक्षक सुरबर्डी, माजी सरपंच विजय धुवे, पोलीस पाटील दिलीप चिडगाम, मारुती नरड तसेच जामगड येथील पशुपालक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वन्यजीवांचे संरक्षण आणि पशुधनाचे आरोग्य यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम वन्यजीव सप्ताह २०२६ अंतर्गत जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.








