– सात जिल्ह्यांतील स्पर्धकांमध्ये चमकदार कामगिरी; अवंतीच्या यशाने कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
संदीप कांबळे, कामठी :- क्रीडांगणावरील जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कामठी तालुक्यातील शिरपूर गावातील रहिवासी अवंती विनोद वानखेडे हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून नागपूर विभागासह कामठी तालुक्यातील घोरपड-शिरपूर गावाचा गौरव वाढविला आहे. त्यामुळे गावातील सरपंच ताराबाई बळवंत कडू यांनी अवंती वानखेडे सह वडील विनोद वानखेडे व संपूर्ण कुटुंबियांचे कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला. नागपूर विभागातील सात जिल्ह्यांमधील स्पर्धकांच्या सहभागातून राज्यस्तरावर पदक मिळविण्याची कामगिरी तिने केली असून, तिच्या या यशामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अवंतीच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे
कुस्ती हा केवळ शारीरिक ताकदीचा खेळ नसून त्यासाठी सातत्यपूर्ण सराव, शिस्त, संयम आणि मानसिक कणखरता आवश्यक असते. या खेळातील आव्हानांना सामोरे जात अवंतीने राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. तिच्या या कामगिरीने वास्तव्य ग्रामीण मधील असो वा शहरातील असो मात्र मेहनतीच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे साध्य केले आहे.
राज्यस्तरावरील स्पर्धेत पदक मिळविणे ही कोणत्याही खेळाडूसाठी महत्त्वाची उपलब्धी असते. अवंतीने मिळविलेले हे यश तिच्या क्रीडा प्रवासातील उल्लेखनीय टप्पा ठरला आहे. तिच्या कामगिरीमुळे नागपूर विभागाच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
अवंतीने यापुढेही कठोर मेहनत, नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात अशीच प्रगती करावी, राष्ट्रीय स्तरावरही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवावा आणि भविष्यात सुवर्णपदक पटकावून यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.








