spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगरधन येथील झांकी स्पर्धेत चाचेरच्या मंडळांचे घवघवीत यश; छत्रपती युवा प्रतिष्ठान प्रथम, तर युवा एकता मित्र मंडळ यांच्या टीमला चतुर्थ क्रमांक

किशोर साहू, मौदा :- विजयादशमी (दसरा) निमित्त नगरधन येथे आयोजित झांकी स्पर्धेत चाचेर येथील दोन मंडळांनी उल्लेखनीय यश संपादन केले. छत्रपती युवा प्रतिष्ठान, चाचेर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर युवा एकता मित्र मंडळ आणि त्यांच्या टीमने चतुर्थ क्रमांक मिळवला. या यशामुळे चाचेर गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे.

छत्रपती युवा प्रतिष्ठान, चाचेर यांच्या वतीने ‘लेकीच्या सुरक्षेसाठी बापाची धडपड अर्थात बाप मायेचा सागर’ या हृदयस्पर्शी विषयावर आधारित झांकी सादर करण्यात आली. बापाचे लेकीवरील प्रेम, तिच्या सुरक्षेसाठीची धडपड आणि समाजातील मुलींच्या सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश या झांकीतून प्रभावीपणे मांडण्यात आला. या उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रतिष्ठानने ₹४१,००० रोख प्रथम पारितोषिक आणि ₹५,००१ प्रोत्साहनपर बक्षीस, अशी एकूण ₹४६,००१ रुपयांची बक्षिसे पटकावली. या यशाबद्दल प्रो. सचिन बावनकुळे आणि छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान, बाजार चौक, चाचेर येथील युवा मित्र मंडळाच्या वतीने ‘श्रीकृष्ण द्वारा शिशुपाल वध’ ही आकर्षक व मनमोहक झांकी सादर करण्यात आली. भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमातून अधर्मावर धर्माच्या विजयाचा संदेश देणाऱ्या या झांकीला चतुर्थ पारितोषिक प्राप्त झाले. प्रो. विशाल बरबटे आणि त्यांच्या टीमला ₹१५,००१ रुपयांचे बक्षीस मिळाले.

दोन्ही झांकींमधून सामाजिक जाणीव, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरांचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रो. सचिन बावनकुळे, प्रो. विशाल बरबटे, दोन्ही मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कलात्मक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक होत आहे.

Popular Articles