– जुनी कामठी पोलिसांची मध्यरात्री कारवाई; संशयिताकडून लोखंडी चाकू जप्त
कामठी :- शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या जुनी कामठी पोलिसांनी मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. मटन मार्केटच्या मागील प्रवेशद्वाराजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित इसमाकडून लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मो रफिक रा हॉकी बिल्डिंग कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२५ वाजता जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात नियमित गस्त घालत होते. याचदरम्यान मटन मार्केटच्या मागील गेटजवळ एक इसम शस्त्र बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी संबंधित ठिकाणी एक इसम संशयास्पदरीत्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने आपले नाव मोहम्मद रफीक उर्फ लिल्लू वल्द मोहम्मद नजीर (वय ४८ वर्षे), रा. हॉकी बिल्डिंगच्या पाठीमागे, बाबुल किराणा दुकानाजवळ, कामठी, नागपूर, असे सांगितले.
पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या आत कमरेजवळ लपवून ठेवलेला सुमारे ३०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू आढळून आला. पोलिसांनी हा चाकू जप्त करीत आरोपीला ताब्यात घेतले. शस्त्र बाळगण्याच्या कारणाचा तसेच या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई अमित ताजणे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे जुनी कामठी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जुनी कामठी पोलीस करीत आहेत.








