🔸तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज!
🔸घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक
🔸प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी!
सचिन चौरसिया, रामटेक :- तालुक्यातील आसोली येथे शॉर्टसर्किटमुळे एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले असून, जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पीडित कुटुंबाने व्यक्त केला आहे. दरम्यान, ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील आसोली येथील रहिवासी रवींद्र सुरेश हटवार यांच्या घराला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीमध्ये घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमुळे पीडित कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले असून, तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थ कडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी कांचन देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आणि नुकसानीचा पंचनामा करून पुढील अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.








