– ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ९ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल
हंसराज,भंडारा :- गोबरवाही पोलिसांनी विनापरवाना मॅग्नीज (काळा दगड) वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि मॅग्नीजसह एकूण ९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिते हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पवनारखारी ते डोंगरी बु. रस्त्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी एका ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून विनापरवाना मॅग्नीजची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी गारकाभोगा (ता. तुमसर, जि. भंडारा) येथील सोविद श्रीराम बिटलाये (वय ४०) याच्या ताब्यातून स्वराज कंपनीचा ८४३ एक्स एम मॉडेलचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH 36 AR 7746) आणि त्याला जोडलेली लाल रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली जप्त करण्यात आली. या ट्रॅक्टर-ट्रॉलीची अंदाजे किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे. तसेच ट्रॉलीतील सुमारे ८ हजार किलो मॅग्नीज जप्त करण्यात आले असून, प्रति किलो ५० रुपये दराने त्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिते यांच्या फिर्यादीवरून बिटलाये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३ (२) अन्वये अपराध क्रमांक ४९८/२०२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिते व पोलीस हवालदार खोब्रागडे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.








