– वाघाच्या हल्ल्यात दोन बैलांचा मृत्यू; शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या
– शिवसेना तालुकाप्रमुख नितेश वांगे यांची मागणी
– राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन
किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील पावडदौना, वांजरा, मोहखेडी व परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात दोन बैलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त बैलमालकांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे यांनी केली आहे.
मौदा तालुक्यातील ग्रामपंचायत वांजरा अंतर्गत येणाऱ्या वांजरा, पावडदौना, मोहखेडी तसेच लगतच्या परिसरात मागील एक वर्षापासून वाघाचा वावर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर भोयर (वांजरा) यांच्या मालकीच्या बैलावर दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी, तर भामेवाडा येथील चंद्रभान उके यांच्या बैलावर दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनांमुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावडदौना, वांजरा व मोहखेडी परिसरात वाघाचा वावर मानवी वस्तीजवळ असल्याने शेतात जाणारे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतातील कामांसाठी बाहेर पडताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भविष्यात मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावावेत आणि ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
नितेश वांगे यांचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन
या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेनेचे मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे, रा. पावडदौना यांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर करून परिसरातील वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बैलांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आह
“पावडदौना, वांजरा, मोहखेडी आणि यंपरिसरात वाघाच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच विविध अडचणींचा सामना करीत असताना अशा घटनांमुळे त्यांच्यापुढे नवे संकट उभे राहिले आहे.
वनविभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. परिसरात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. तसेच वाघाच्या हल्ल्यात बैल गमावलेल्या सागर भोयर, चंद्रभान उके व अन्य नुकसानग्रस्त पशुपालकांना नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी. भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळ न दवडता आवश्यक कार्यवाही करावी,” अशी मागणी शिवसेना मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे यांनी केली.
वनविभागाच्या कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष
वाघाच्या वाढत्या वावरामुळे पावडदौना, वांजरा, मोहखेडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता वनविभाग या गंभीर परिस्थितीवर कोणती ठोस पावले उचलणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती लवकर मदत मिळणार, याकडे संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








