– विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती; पर्यावरण संवर्धनाचा संदेश!
किशोर साहू, मौदा :- आनंददायी शनिवार अंतर्गत परिसर अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने जि प शाळा तोंडली येथील विद्यार्थ्यांनी गावातील शामलाल धांडे यांच्या घरी असलेल्या गोबरगॅस संयंत्राला क्षेत्रभेट दिली. परिसर अभ्यास विषयात गोबरगॅस संयंत्राची थोडक्यात माहिती देण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात गोबरगॅस म्हणजे नेमके काय? त्याची निर्मिती कशी होते? संयंत्राची बांधणी कशी असते? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? असे अनेक प्रश्न निर्माण झाले.
विद्यार्थ्यांच्या या जिज्ञासेचे निरसन करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष गोबरगॅस संयंत्र दाखविण्यात आले. यावेळी संयंत्राची कार्यपद्धती, शेणापासून जैववायूची निर्मिती, स्वयंपाकासाठी होणारा त्याचा उपयोग तसेच संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या अवशेषांचा खत म्हणून होणारा वापर याविषयी माहिती देण्यात आली. शामलाल धांडे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत त्यांना संयंत्राविषयी सविस्तर माहिती दिली.
विज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे उपयोगी पडते, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. गोबरगॅससारख्या पर्यायी ऊर्जास्रोतांमुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. तसेच सेंद्रिय पदार्थांचा योग्य वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरण संवर्धन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या वेळी मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नोत्तर आणि मुलाखतीच्या माध्यमातून ज्ञान संपादन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण कौशल्य, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली. हा उपक्रम राबवण्यात सहशिक्षक निलेश जाधव यांचे सहकार्य लाभले.
पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारी ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, आनंददायी आणि प्रेरणादायी ठरली.








