– ३४ दिवसांत १५.५० लाख रुपयांचा PLI दावा मंजूर
हंसराज, तुमसर :- भारतीय सैन्यदलातील जवान आशिष लाला पांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला भारतीय डाक विभागाच्या टपाल जीवन विमा (PLI) योजनेतून आर्थिक आधार मिळाला आहे. दोन विमा पॉलिसींचा १५ लाख ४९ हजार ९६६ रुपयांचा मृत्यू दावा अवघ्या ३४ दिवसांत मंजूर करण्यात आला. जवानाच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आई आणि भाऊ असा परिवार आहे.
डाक विभागाच्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर २३ सप्टेंबर २०२६ रोजी दावा मंजूर करण्यात आला. या प्रक्रियेत वहाणी पोस्ट ऑफिसचे सहायक शाखा डाकपाल (ABPM) जय भास्कर सानप यांनी कुटुंबाला मार्गदर्शन करून सातत्याने पाठपुरावा केला.
भंडारा उत्तर उपविभाग, तुमसरचे उपविभागीय डाक निरीक्षक अजय अडांगे, उपविभागीय डाक सहाय्यक स्वप्नील चामट आणि जय सानप यांच्या उपस्थितीत जवानाच्या आई शशिकला पांडे व भाऊ अजय पांडे यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
डाक विभागाने नागरिकांना PLI व ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनांची माहिती घेऊन कुटुंबासाठी योग्य विमा योजना निवडण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधता येईल.








