यवतमाळ :- मुंबई येथील सराफा व्यावसायिकाने ना.म. जाेशी मार्ग लोअर परेल येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेत तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई पाेलिसांनी यवतमाळ शहरातील ५ सराफांना नाेटीस बजावली आहे. त्यांना चाैकशीसाठी ३१ ऑक्टाेबर रोजी सकाळी ११ वाजतापर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सराफांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
भावीन सोगरमल शाह यांनी मुंबई पाेलिसांना दिलेल्या अर्जानुसार त्यांचा नोकर तुषार भरत राठाेड याने १२.५ शुद्ध सोन्याच्या व्यवहारात फसवणूक केली. त्या नाेकराने हे सोने यवतमाळातील सराफांना दिल्याच्या चिट्ठ्या व्हॉट्सॲपवरून मालकाला पाठविल्या आहेत. एकूणच या प्रकरणाची चाैकशी करून कारवाई केली जावी, असा अर्ज शाह यांनी दाेन दिवसापूर्वी पाेलिसांकडे केला. आता या अर्जाची चाैकशी करण्यासाठी मुंबई पाेलिसातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील प्रभारी पाेलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी व्हॉट्सॲपवरून सराफांना नाेटीस बजावली आहे.
अनेक सराफांनी संबंधिताकडून साेने खरेदीचा काेणताही व्यवहार केला नाही, त्यानंतर नाेटीस आल्याने या नाेटीसबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. गणेश पिसाळ या अधिकाऱ्यांच्या नावाची स्वाक्षरी व त्यांचा माेबाईल क्रमांक टाकून नाेटीस व्हाॅट्सपवर आली आहे. त्यामुळे गुरूवारी यवतमाळातील सराफा व्यावसायिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे.
व्हॉट्सॲपवरची नाेटीस किती खरी
सराफांमध्ये या नाेटीसच्या सत्यतेबाबतच संभ्रम आहे. मागील वर्षभरात काेणताच व्यवहार नसताना नाेटीस कशी, तिही थेट माेबाइलवर यावरून विविध चर्चांना पेव फुटले आहे. दरम्यान लाेकमतने प्रभारी पाेलिस निरीक्षक म्हणविणाऱ्या गणेश पिसाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शाह यांच्या तक्रार अर्जाची चाैकशी करत असल्याचे सांगितले. अशा प्रकारे २५ सराफांना नाेटीस दिली असल्याचेही ते म्हणाले. मात्र याबाबत माध्यमांना अधिक माहिती देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी पुढे बोलणे टाळले.







