– महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार बाजारपेठ; नागरिकांना खरेदीचे आवाहन
हंसराज, भंडारा :- ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ व विविध सजावटीच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत भंडारा येथे दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाला असून ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांच्या वतीने जिल्हा परिषद परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेले पारंपरिक दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे यांसह आकर्षक आकाशकंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तू आणि अन्य दिवाळी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ग्रामीण महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण व घरगुती उत्पादनांच्या विक्रीतून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी ५ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद परिसरात आयोजित या महोत्सवाला भेट देऊन महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तू व फराळाची खरेदी करावी आणि ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाच्या वाटचालीला हातभार लावावा, असे आवाहन उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.








