spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र तातडीने जमा करावे – अध्यक्ष प्रांजल राजेश वाघ

– कामठी तालुक्यात ७,९०३ हयात प्रमाणपत्रे प्रलंबित; ८२९ दिव्यांगांचे UDID प्रमाणपत्र बाकी

संदीप कांबळे, कामठी :-कामठी तालुक्यातील निराधार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ नियमितपणे मिळावा, यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष प्रांजल राजेश वाघ यांनी केले आहे.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी दरवर्षी ज्या महिन्यात हयात प्रमाणपत्र (DLR) सादर केले होते, त्याच महिन्यात प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, कामठी तालुक्यात सध्या ७ हजार ९०३ हयात प्रमाणपत्रे प्रलंबित असून, संबंधित लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र तातडीने जमा करावे, असे आवाहन प्रांजलताई वाघ यांनी केले.

कामठी तालुक्यातील ८२९ दिव्यांग बांधवांचे UDID प्रमाणपत्र अद्याप प्रलंबित आहे. दिव्यांग बांधवांनी तातडीने UDID प्रमाणपत्र काढून घ्यावे, जेणेकरून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय, कामठी येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात येत असून, दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत एकूण ३८० प्रकरणे पूर्ण करण्यात आली. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप योजनेचे अनुदान जमा झालेले नाही, त्यांनी आधार कार्ड घेऊन संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे व OTP द्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यामुळे लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान नियमित मिळण्यास मदत होणार आहे.

या बैठकीला ऋषी भेंडे, विनोद बावनकुळे, नरेश मोहबे, चंद्रशेखर तुप्पट, प्रीतम लोहसारवा, भगवान कोरडे व सुभाष धुळसे उपस्थित होते.

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी समिती कटिबद्ध असून, सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य करावे, असे आवाहन , संजय गांधी निराधार योजना समितीचे कामठी, तालुका अध्यक्ष प्रांजल राजेश वाघ यांनी केले आहे.

Popular Articles