– युरोप, रशिया आणि मध्य आशियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झाले ब्लॅक-हेडेड गल पक्षी
अकोला :- हिवाळ्यामध्ये परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे जलाशयांवर आगमन होत असते. यंदा ‘ब्लॅक-हेडेड गल’ या आकर्षक जलपक्ष्याचे दर्शन जिल्ह्यातील काटेपूर्णा अभ्यारण्यातील जलाशयांमध्ये झाले. युरोप, रशिया आणि मध्य आशियातील प्रजनन क्षेत्रातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हा पक्षी विदर्भात दाखल झाला आहे, अशी माहिती पक्षीमित्र व मानद वन्यजीव रक्षक अमोल सावंत यांनी दिली.
किनारा स्वच्छता व पक्षी निरीक्षण उपक्रम
पक्षी सप्ताहानिमित्त काटेपूर्णा अभयारण्यात किनारा स्वच्छता व पक्षी निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला. गत तीन वर्षापासून या पक्ष्याचे आगमन काटेपूर्णा अभयारण्यात होत आहे. पूर्वी दोन-तीन संख्येत पक्षी दिसत होते. यंदा सुमारे १५ पक्षांची नोंद झाली. वन पर्यटक नागसेन आकोडे यांना पक्ष्यांचे दर्शन घडले. वन्यजीव छायाचित्रकार विलास देशमुख यांनी पक्ष्यांचे छायाचित्र घेऊन ओळख पटवली. पक्षीमित्र मनोज लेखनार व प्रदिप किडीले उपस्थित होते.
हिवाळ्यात डोके पांढरे अन् डोळ्याच्या मागे काळसर ठिपका
ऑक्टोबर ते मार्च या काळात राज्यातील तलाव, नद्या, धरणांचे जलाशय आणि पाणथळ प्रदेशात स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडते. ‘ब्लॅक-हेडेड गल’ याची लांबी साधारण ३५ ते ४५ सेंटीमीटर असते. शरीर पांढरे, पाठ व पंख करड्या रंगाचे, पंखांची टोके काळी, तर चोच आणि पाय लालसर असतात. प्रजनन काळात डोके गडद चॉकलेटी तपकिरी रंगाचे होते. मात्र, हिवाळ्यात डोके पांढरे असून डोळ्याच्या मागे काळसर ठिपका दिसतो. हे त्याचे प्रमुख ओळखचिन्ह असून हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.
मानवी हस्तक्षेपामुळे स्थलांतरित पक्ष्यांसमोर आव्हाने
लहान मासे, जलचर कीटक, गांडुळे आणि इतर लहान जलचर प्रमुख खाद्य आहे. पाण्यात खाद्य टिपणे, उथळ पाण्यात भक्ष्य शोधणे आणि समूहाने खाद्य मिळवणे अशा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सवयी आहेत. तलाव, नद्या, धरणांचे जलाशय आणि दलदलीचे प्रदेश हा प्रमुख अधिवास आहे. ‘आययूसीएन’च्या जागतिक लाल यादीत या पक्ष्याचा समावेश कमी चिंताजनक या श्रेणीत असला, तरी पाणथळ जागांचे प्रदूषण, अधिवासांचा ऱ्हास आणि मानवी हस्तक्षेप यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसमोर आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे जलाशय स्वच्छ ठेवणे, पाणथळ अधिवासांचे संवर्धन करणे आणि पक्ष्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप टाळणे आवश्यक असल्याचे अमोल सावंत म्हणाले.






