किशोर साहू, मौदा :- श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिविंग या सामाजिक संस्थेतर्फे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याची पातळी खूप खोल जाऊ नये, नागरिकांसह,गुराढोरांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावा यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील गावागावातून वाहणाऱ्या नाल्यांवर ताडपत्री बंधारे बनवण्याच्या उपक्रम युद्ध स्तरावर सुरू आहे. मात्र आज बुधवार (ता.११ नोव्हेंबर)ला ग्रामपंचायत खंडाळा (गांगणेर) येथील सरपंच संकेत झाडे ,सचिव श्रद्धा सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत कर्मचारी सतीश वाघमारे यांच्या देखरेख अंतर्गत गावातील शेतकरी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने खंडाळा- गांगणेर गावादरम्यान असलेल्या पुलावर ताडपत्री बंधारा बांधला.
शासकीय यंत्रणेची व सामाजिक संस्थेची वाट न पाहता गावातील नागरिक ,शेतकरी एकत्र येऊन सर्वांनी सहकार्य केल्यास त्यांच्या समस्या त्या स्वतः विना विलंब सोडवू शकतात हा संदेश खंडाळा (गांगणेर) येथील यशस्वीरित्या बनविलेल्या ताडपत्री बंधाऱ्यातून परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही जाईल व त्याचे अनुकरण परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील व राज्यातील नागरिक व शेतकरी निश्चितच करतील, अशी भावना पुलावर उभा असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर बोलून दाखवली.






