spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान जनजाती गौरव दिन सेवा सप्ताह

– आदिवासी समाजाने सहभागी होण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

मुंबई :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 151 वी जयंती असल्यानिमित्त 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान जनजाती गौरव दिन सेवा सप्ताह साजरा करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. या कालावधीत आदिवासी समाजासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे उपस्थित होते.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाज आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली होती. यंदा जनजाती गौरव दिन सेवा सप्ताहात 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी देशभरात पत्रकार परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात 13 नोव्हेंबर रोजी आदिम कातकरी जमातीचे बांधव राहत असलेल्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून कातकरी समाजातील बांधवांना जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मनोंदणी तसेच इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येईल, असा तपशील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मांडला.

14 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व स्वातंत्र्यवीर आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी दीपस्तंभ आणि रोषणाई करण्यात येईल. आदिवासी बांधवांसह इतर समाजबांधवांनीही या उपक्रमात सहभागी होऊन संबंधित परिसरात रोषणाई करावी, असा संकल्प करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प कार्यालयांमध्ये क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील आदिवासी समाज आणि इतर बांधवांना शुभेच्छा संदेश देणार आहेत तर राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती उईके यांनी दिली.

17 नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजातील पारधी बांधवांसाठी विशेष उपक्रम राबवत पारधी समाजाचे बांधव राहत असलेल्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून त्यांना विविध योजनांचा लाभ आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचप्रमाणे 18 नोव्हेंबर रोजी सर्व प्रकल्प कार्यालये आणि एटीसी कार्यालयांच्या माध्यमातून शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि नामांकित शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार देण्यात येतील, असे उईके म्हणाले.

Popular Articles