– प्रवाशांच्या गैरसोयीकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष ?
बेला :- ग्रामपंचायतीने नव्याने बांधलेल्या प्रवासी निवाऱ्यासमोर खाजगी वाहनांचा ठिय्या उभा राहतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.प्रवासी व बसस्थानकाचे व्यवस्थेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. सदर वाहनांवर बीट जमादाराचा आशीर्वाद असल्यामुळे वाहने तिथून हटत नसल्याची गावात चर्चा आहे.
चारचाकी वाहने उभी राहत असल्याने निवाऱ्यात बसलेल्या प्रवाशांना येणारी,जाणारी व उभी असणारी बस दिसत नाही. त्यामुळे बसण्याची चांगली व्यवस्था असताना प्रवासी मोकळ्या जागेत उन्हातानात उभे राहून बसची वाट पाहतात.बसस्थानकावर उभ्या राहणाऱ्या वाहनांपैकी बहुतांश वाहने खाजगी प्रवासी वाहतुकीच्या धंदा करतात.इतर वाहने पार्किंगची जागा समजून आपली वाहने लावून ठेवतात.ती वाहने दोन,चार घंटे उभी राहतात. वाहनांच्या ठिय्यामुळे निवाऱ्यातून बाहेर पडण्यास देखील प्रवाशांना पायवाट रस्त्याएवढी जागा शिल्लक नसते. त्यामुळे नवीन प्रवासी निवारा असून नसल्यासारखा झाला आहे.प्रवाशांची होत असलेली कुचंबना ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना दिसत असतानाही वाहनांचा ठिय्या प्रवासी निवाऱ्यासमोर कायम आहे.यावरून केवळ निवारा उभा करून प्रवाशांना ग्रामपंचायतीने वाऱ्यावर सोडले अशी गावात चर्चा आहे.
बसस्थानकावर उभे राहणाऱ्या बऱ्याचशा वाहनांकडून पोलीस व बीट जमादारास मासिक वसुली मिळत असल्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्या जात असल्याचे बोलल्या जाते.
व्यापार संकुलासाठी जुना निवारा पाडला
व्यापार संकुलाचे बांधकामासाठी ग्रामपंचायतीने परिवहन महामंडळाचा तीस-पस्तीस वर्षापासून उभा असणारा जुना प्रवासी निवारा पाडला. सोबतच त्यामागील पुरुषांच्या सार्वजनिक मुत्रीघरावरील टिनपत्रे काढली.परिवहन महामंडळाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे २९ ऑक्टोबरचे रात्रीला हा प्रवासी निवारा ग्रामपंचायतीने उध्वस्त केला. असे नागरिकांनी सांगितले.व्यापार संकुलाचे गाळे वाटप व लिलावातून ग्रामपंचायतीला भरमसाठ उत्पन्न मिळेल.या भावनेने प्रवाशांकडे दुर्लक्ष करून व्यापार संकुलासाठी जुना प्रवासी निवारा पाडला अशी गावात चर्चा आहे. वास्तविकता जुना प्रवासी निवाराच प्रवाशांसाठी सोयीचा होता.






