spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर येथे १५ नोव्हेंबरला जनजातीय गौरव सोहळा; भव्य रॅलीचे आयोजन

– विद्यार्थी, खेळाडू, कलावंत, साहित्यिक व प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार गौरव;

हंसराज, भंडारा :- भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी तुमसर येथे ‘जनजातीय गौरव दिन’ सोहळा आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनजातीय कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम शकुंतला सभागृह भंडारा रोड तुमसर येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु कारेमोरे यांच्या हस्ते होणार असून विधान परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर सहउद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी सावनकुमार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, तुमसर नगराध्यक्ष सागर गभने, उपाध्यक्ष सचिन बोपचे, नगरसेवक योगेश सिडाम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भव्य रॅलीने होणार कार्यक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आदिवासी मुलींचे वसतिगृह, तुमसर येथून भव्य रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली भंडारा रोडवरील शकुंतला सभागृह येथे पोहोचणार आहे. रॅलीच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि भगवान बिरसा मुंडा यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

या सोहळ्यात आश्रमशाळा व वसतिगृहांतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांसह गुणवंत विद्यार्थी आणि MPSC, UPSC, MBBS तसेच उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान होईल.

याशिवाय पारंपरिक नृत्य, संगीत, वाद्यवादन व लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कलावंत, साहित्यिक, कवी, लेखक, चित्रकार आणि शिल्पकार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. आदिवासी बोलीभाषा, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठी योगदान देणाऱ्यांचाही गौरव केला जाणार आहे.

आधुनिक शेती आणि सेंद्रिय कृषी प्रयोगांद्वारे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी कारागीर व कलाकारांसाठी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पारंपरिक कला, कौशल्य आणि कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा, विचारांचा आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देणाऱ्या या सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी, पालक आणि आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांनी केले आहे.

Popular Articles