spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जमिनीत पुरलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

– गडचिरोलीत सी- ६० जवानांची मोठी कारवाई

गडचिरोली :- सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेले शस्त्र व स्फोटक साहित्याचा मोठा साठा गडचिरोलीपोलिस दलाने मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी उद्ध्वस्त केला. एटापल्ली तालुक्याच्या गर्देवाडा ठाणे हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात विशेष मोहिमेदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली.

हिक्केर जंगल परिसरातील घटना

जिल्ह्यातून माओवाद संपत चालला असून नागरिक दहशतीमधून मुक्त होत आहेत. असे असतानाही, भूतकाळात सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्यासाठी व घातपाताच्या कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी दुर्गम जंगल परिसरात शस्त्रे व स्फोटके जमिनीत लपवून ठेवली होती. निवडणुका किंवा नक्षल सप्ताह दरम्यान सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असे. गर्देवाडा ठाण्याच्या हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात माओवाद्यांनी स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर रोजी विशेष अभियान पथक व प्राणहिता येथील ५ तुकड्या तसेच बीडीडीएसचे (बॉम्ब शोधक व नाशक) दोन पथक जंगलात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले. जंगल परिसरात कसून शोध घेतला असता, पोलिसांच्या हाती माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा लागला.

जप्त केलेले साहित्य असे….

१ नग १२ बोर रायफल, १ नग एअर गन रायफल, १३ नग ३०३ जिवंत काडतूस व १८ नग ८ एमएम जिवंत काडतूस,३ नग ग्रेनेड, १८ नग बीजीएल सेल, २ नग बीजीएल लाँचर, १० नग डेटोनेटर, २१ नग सुराका सेल, १ नग होंडा कंपनीचे इलेक्ट्रिक जनरेटर व २२ नग वायर बंडल यांसह मोठ्या प्रमाणावर इतर माओवादी साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी. जे., उप-अधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक व जवानांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

Popular Articles