spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गहाणखत व बक्षीसपत्राच्या नावाखाली दलालांकडून होणारी गोरगरिबांची लूट थांबवा

– विदर्भ माहिती अधिकार चळवळीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना फायनान्स बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी आणि दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माहिती अधिकार चळवळीचे जिल्हाध्यक्ष प्रविण अंकुश मेहर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, सह जिल्हा निबंधक वर्ग-१ आणि जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख), भंडारा यांना निवेदन सादर केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिक मुलांचे शिक्षण, आजारपण किंवा इतर कामांसाठी नाइलाजास्तव फायनान्स बँकांकडून कर्ज घेतात. त्यासाठी हक्काचे घर रजिस्ट्री कार्यालयाद्वारे गहाणखत करून द्यावे लागते. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक शासनाचा जीआर असल्याचे सांगून ‘गावठाण आणि चतुर्सिमा’ दाखला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच १९७० च्या सिटी सर्व्हेनुसार आखीव पत्रिका वडील किंवा आजोबांच्या नावे निघत असून, अनेक गरिबांची घरे सर्व्हेमधून सुटली आहेत.

या कायदेशीर गुंतागुंतीचा गैरफायदा घेत काही दलालांनी रॅकेट चालवले आहे. खोटे दस्तऐवज तयार करून कर्जधारकांकडून अवाढव्य रक्कम उकळली जात असून, बेकायदेशीरपणे गहाणखत व बक्षीसपत्रे लावून दिली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जिल्हास्तरीय विशेष उपाययोजना करावी, कागदपत्रांचा त्रास कमी करण्यासाठी यंत्रणेला योग्य आदेश द्यावेत आणि गरिबांची लूट करणाऱ्या दलालांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मेहर यांनी केली आहे.

Popular Articles