spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दारूबंदीच्या वर्ध्यात अवैध दारूचा महापूर!

– राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

वर्धा :- महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि १९७४ पासून कागदोपत्री ‘दारूबंदी’ असलेल्या जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय विशेष पथकाने वर्ध्यात तळ ठोकल्याने अवैध दारू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. या पथकाने शहरातील १० ते १५ बड्या दारू विक्रेत्यांच्या घरांवर छापे मारले आहेत.

सहा ते सात गाड्यांचा ताफा घेऊन थेट घरांवर धडक देणाऱ्या या पथकामुळे शहरातील अडीचशेहून अधिक दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. अनेकांनी आपले अड्डे बंद करून जिल्ह्याबाहेर पळ काढल्याचे बोलले जात आहे. शहरालगतच्या विक्रमशीला नगर येथील ‘समुद्रे’ नामक विक्रेत्याच्या अड्ड्यावर शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी धाड टाकून पथकाने तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. तसेच शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास महादेवपुरा येथील ‘शिवा’ नामक दारूविक्रेत्याच्या घरावर छापा टाकून गोवा, दीव-दमण आणि मध्य प्रदेश बनावटीची विदेशी दारू जप्त केली. याव्यतिरिक्त इतर छाप्यांमध्ये नेमका किती मुद्देमाल जप्त झाला, याचा आकडा अद्याप गुलदस्त्यात आहे.

सहा गाड्यांचा ताफा अन् धडाधड छापेमारी

गेल्या दोन दिवसांपासून राज्यस्तरीय पथकाने शहरात मोठी मोहीम उघडली आहे. अमरावती, यवतमाळ आणि नागपूर येथील संयुक्त पथकासह ६ ते ७ वाहनांचा ताफा सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच शहरातील विविध भागात धडक देत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, या पथकाने शहरातील १० ते १५ बड्या दारू विक्रेत्यांच्या घरांवर छापे मारले आहेत.

स्थानिक उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

राज्यस्तरीय पथक दोन दिवसांत एवढी मोठी कारवाई करू शकते, तर मग वर्ध्यातील स्थानिक उत्पादन शुल्क विभाग नेमका करतो तरी काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करत स्थानिक विभागाची कारवाई केवळ कागदावरच दिसून येते. आजवर शहरात ज्या काही कारवाया झाल्या, त्या प्रामुख्याने पोलिस प्रशासनानेच केल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय पथकाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिक विभागाच्या निष्क्रियतेचा पंचनामाच झाला आहे.

Popular Articles