spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इच्छाशक्ती असेल तर परिवर्तन शक्य; सोलापूर बसस्थानकाचा कायापालट

– अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक!

मुंबई :- इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची तयारी असेल, तर कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणता येते, याचा प्रत्यय सोलापूर एसटी बसस्थानकाच्या बदललेल्या स्वरूपातून आला आहे. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकाला अचानक भेट दिली होती. यावेळी बसस्थानकातील अस्वच्छता आणि असुविधा पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत, केवळ इच्छाशक्तीच्या बळावर परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणता येतो, असा स्पष्ट संदेश दिला होता.

मंत्र्यांच्या या सूचनेची स्थानिक एसटी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत तातडीने कार्यवाही सुरू केली. त्यातून आता सोलापूर बसस्थानकाचे रूप पालटण्यास सुरुवात झाली आहे. बसस्थानकाच्या भिंतींवर सोलापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैभवशाली वारशाची आकर्षक चित्रे साकारली जात आहेत. या चित्रांमुळे बसस्थानकाचा परिसर अधिक सुंदर, प्रसन्न आणि आकर्षक होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर सोलापूर शहराची ऐतिहासिक ओळख आणि सांस्कृतिक परंपरा प्रवाशांसमोर उलगडण्याचा अभिनव प्रयत्नही केला जात आहे.

विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या भेटीनंतर केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता बसस्थानकाचा संपूर्ण परिसर अधिक देखणा आणि प्रवाशांसाठी आनंददायी करण्याच्या दृष्टीने स्थानिक अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या सकारात्मक बदलाची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर एसटी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. वरिष्ठांच्या सूचनांना केवळ आदेश म्हणून न पाहता त्यातून प्रत्यक्ष कामात बदल घडवून आणण्याची अधिकाऱ्यांची भूमिका अभिनंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोलापूर बसस्थानकातील हा बदल राज्यातील अन्य एसटी बसस्थानकांसाठीही प्रेरणादायी ठरावा. इच्छाशक्ती असेल तर परिवर्तन अशक्य नाही, हे सोलापूरच्या एसटी प्रशासनाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Popular Articles