spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वादळी वेदनेचे विद्रोही महाकवी ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय रंगारींना ‘प्रजासत्ताक गौरव – मानवसेवा पुरस्कार २०२६’ प्रदान

– भंडाऱ्याच्या सुपुत्राच्या कार्याची मानवाधिकार फाउंडेशनकडून दखल; जीवनावर आधारित चित्रपट लवकरच भेटीला

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- प्रजासत्ताक मूल्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवून सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे भंडाऱ्याचे सुपुत्र, ‘इलेक्ट्रिक मॅन’ म्हणून ओळखले जाणारे विद्रोही महाकवी अभय देवाजी रंगारी यांना प्रतिष्ठित ‘प्रजासत्ताक गौरव – मानवसेवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे. मानवाधिकार फाउंडेशन (भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत नोंदणीकृत) यांच्या वतीने त्यांच्या अविस्मरणीय सामाजिक कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक विचारधारेवर निष्ठा ठेवून अभय रंगारी यांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा प्रचार-प्रसार केला. मतदानाबाबत जनजागृती, मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि शोषितांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. सध्या ते राष्ट्रीय किसान मोर्चाचे भंडारा जिल्हा संयोजक म्हणून शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व करत आहेत.

चित्रपटसृष्टीतही कार्याची दखल; ‘गेम चेंजर’मध्ये झलक

अभय रंगारी यांच्या जीवनप्रवासावर आधारित लवकरच एका चित्रपटाची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्टॅम्प पेपरवर राजकीय जाहीरनामा देण्याचा जो ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला होता, त्याचे प्रतिबिंब दाक्षिणात्य चित्रपट ‘गेम चेंजर’ मधील एका दृश्यात पाहायला मिळते. त्यांच्या या निर्णयाची भारतीय राजकीय इतिहासात एक प्रेरणादायी मिसाल म्हणून चर्चा होत आहे.

. पुरस्कारांची मोहोर

अभय रंगारी यांना आजवर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे, त्यात प्रामुख्याने:

🔹 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजसेवक पुरस्कार (संभाजीनगर)

🔹 कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार (मुंबई)

🔹 गोल्डन पिकॉक अवॉर्ड (मुंबई)

🔹 मानवाधिकार पुरस्कार (अहिल्यानगर)

🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार (कोल्हापूर)

🔹 जीवनगौरव पुरस्कार (पवनी)

🔹 प्रबोधिनी स्टार पुरस्कार (चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

“माणूस पाहून माणसाची ओळख करणारा माणूस” अशी ओळख असणाऱ्या अभय रंगारी यांच्या या यशामुळे भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या या विद्रोही महाकवी आणि ‘इलेक्ट्रिक मॅन’ रूपाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular Articles