– अग्निशमन व आपात्कालिन सेवा समितीच्या सभापती रुपाली ठाकूर यांचे निर्देश
नागपूर :- शहरातील उंच इमारती, शाळा व हॉस्पीटल व्यवस्थापनाला अग्निशमन यंत्रणा लावण्याची सक्ती करावी, या यंत्रणेची पूर्तता न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश अग्निशमन व आपात्कालिन सेवा विशेष समितीच्या सभापती रुपाली ठाकूर यांनी दिले.
अग्निशमन व आपत्कालीन सेवा विशेष समितीची बैठक आज (ता.7) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती रुपाली ठाकूर होत्या. यावेळी समितीचे उपसभापती लखन येरावार, नगरसेवक बाबाराव तायडे, नगरसेवक सिराज अहमद अंसारी, नगरसेवक तुषार लारोकर, नगरसेविका प्रगती यादव, नगरसेविका सायमा नाज फैयाज कुरेशी यांच्यासह मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, तुषार बारहाते व शहरातील अग्निशमन केंद्राचे प्रमुख उपस्थित होते.
शहरात 1200 इमारतींच्या मालकांनी अग्निशमन यंत्रणाचे नियमांचे उल्लंघन केले आहे तर शहरातील 1400 इमारतींच्या मालकांनी अग्निशमन सेवा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सर्व इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्तीने लावण्यासाठी नोटीस तसेच विभागातर्फे पाठपुरावा, असे निर्देश रुपाली ठाकूर यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज
पावसाळ्यात मुसळधार पाऊस आल्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाकडे 13 बोटी आहेत. तसेच लाईफ जॅकेट व इतर साहित्य असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सखल भागात वारंवार पाणी साचणार्या स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. या स्थळांवर विशेष लक्ष ठेऊन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अग्निशमन जवानांचे कौतुक
यावेळी सभापती रुपाली ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या दिवसांमध्ये अग्निशमन व आपात्कालिन सेवा विभागाच्या जवानांनी केलेल्या बचाव कार्याचे कौतुक केले. या काळात जवानांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून लोकांचे व विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले. याबद्दल सर्व जवान प्रशंसेला पात्र असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.





