spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खाप्यात ‘नशामुक्त अभियान’ उत्साहात संपन्न, विद्यार्थी, पोलीस, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; व्यसनमुक्त समाजाचा दिला संदेश

खापा, वार्ताहर :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, कामठी यांच्या वतीने ‘नशामुक्त अभियान’ व ‘मिशन स्पंदन’ अंतर्गत बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी खापा शहरात विविध ठिकाणी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. नागरिक, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला.

या अभियानादरम्यान तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू, ई-सिगारेट तसेच विविध अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना व नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. व्यसनामुळे आरोग्याची होणारी हानी तसेच कुटुंब आणि समाजावर होणारे विपरीत परिणाम समजावून सांगण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘नशा नको – शिक्षण हवे’, ‘आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा’, ‘व्यसनाला नकार – उज्ज्वल भविष्याचा स्वीकार’ असा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या अभियानात खापा पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड, पोलीस पाटील, राजेंद्र हायस्कूलचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी, जिजामाता हायस्कूलचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी, नगर परिषद खापा येथील अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक-नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, जवाहर हायस्कूलचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुमगाव माईन येथील नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नगर परिषद खापा यांच्या वतीने नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, महिला बालकल्याण सभापती वैशाली लिखार, नगरसेविका निशा कठौते, शोभा कारणकर (मानकर), प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, मुख्याध्यापक सुनील नेहारे, मुख्याध्यापक सुधाकर गजभिये, मॉयल मॅनेजर उमेश चरपे, गोदरेज फीडबॅक फाउंडेशनचे मॅनेजर जितेंद्र पासवान यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

“व्यसनमुक्त समाजासाठी सामूहिक संकल्प”

‘नशामुक्त अभियान’च्या माध्यमातून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवून शिक्षण, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीकडे वळविण्याचा संदेश देण्यात आला. “व्यसनाला नकार देऊया, निरोगी आणि सशक्त समाज घडवूया,” या सामूहिक संकल्पाने अभियानाची सांगता झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.