spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी नगर परिषदेत विशेष मतदार यादी पुनरीक्षणावर सर्वपक्षीय बैठक

– ‘एकही पात्र मतदार वंचित राहू नये’ —मुख्याधिकारी विनोद जाधव 

कामठी :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामठी विधानसभा मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत आज कामठी नगर परिषद सभागृहात सर्वपक्षीय प्रतिनिधींची विशेष आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी विनोद जाधव होते. सदर बैठकीस सहाययक मतदार नोंदणी अधिकारी रत्नमाला फटींग, नगर परिषद निवडणूक विभागाचे अधिकारी ,कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे अधिकृत पदाधिकारी,तसेच बूथ लेव्हल एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा संपूर्ण आराखडा सादर करण्यात आला. नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच हरकती व सूचना दाखल करण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे सांगण्यात आले.तसेच बीलओ यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून तयार केलेल्या (गैरहजर,स्थलांतरित,मृत व दुबार)मतदारांच्या हस्तलिखित याद्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच आवश्यकतेनुसार या याद्यांच्या प्रति राजकीय पक्षाच्या बीएलए यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची बारकाईने पडताळणी करून त्रुटी निदर्शनास आणण्याचे आणि नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच चुकीची अथवा दुबार नावे वेळेत दुरुस्त करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. प्रशासनाने त्या सूचनांची सकारात्मक दखल घेत पुनरीक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याचे आश्वासन दिले.

“एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये,” हा संदेश देत प्रशासनाने सर्व नागरिक, राजकीय पक्ष, बीएलओ आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून मतदार यादी शंभर टक्के अचूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. अशा समन्वयातूनच आगामी निवडणुकांची विश्वासार्हता आणि लोकशाहीची ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.