spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्राला मंजुरी

मुंबई :- अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बातमी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता अभिजात मराठीच्या अध्ययन आणि संशोधनाला संस्थात्मक बळ मिळणार आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राज्य सरकारने यापूर्वीच हाती घेतले आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केल्यानंतर केंद्राच्या स्थापनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही भाषा, इतिहास, पुरातत्त्व आणि भारतीय संस्कृतीच्या अध्ययन-संशोधनासाठी महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे अभिजात मराठीच्या प्राचीन साहित्याचा, भाषेच्या ऐतिहासिक वाटचालीचा आणि विविध साहित्यिक व भाषावैज्ञानिक पैलूंचा अभ्यास करण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून हा निर्णय झाल्याने मराठी भाषिकांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Popular Articles