– महिला बचत गटांना मिळाले आर्थिक बळ; १ लाख ५७ हजारांहून अधिक मूर्तींची विक्री
अलिबाग :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महिला बचत गटांनी गणेशमूर्ती व्यवसायातून यंदा तब्बल १५ कोटी ७४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य मिळाल्याने गणेशमूर्ती निर्मितीच्या व्यवसायाला चांगली चालना मिळाली. या उपक्रमातून महिलांना रोजगाराची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक स्वावलंबनालाही हातभार लागला आहे.
‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर विविध भागांतील बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी १ लाख ५७ हजार ६१२ गणेशमूर्तींची निर्मिती केली. गणेशोत्सवाच्या काळात या मूर्तींची विक्री करण्यात आली. त्यातून एकूण १५ कोटी ७४ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
रायगडमधील पेण तालुका गणेशमूर्ती निर्मितीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. पेणमध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना देशासह परदेशातही मागणी आहे. सुबक रचना, आकर्षक रंगकाम, कलात्मक कोरीवकाम आणि रेखीव डोळ्यांमुळे पेणच्या मूर्तींनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायाला भौगोलिक मानांकनही प्राप्त झाले आहे.
गणेशमूर्ती निर्मितीच्या व्यवसायातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन पेणसह रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांना या उपक्रमाशी जोडण्यात आले. व्यवसायासाठी ‘उमेद’ अभियानामार्फत बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आला. तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळाला.
या उपक्रमामुळे गणेशमूर्ती निर्मितीच्या पारंपरिक व्यवसायाला नव्या पद्धतीने रोजगाराचे स्वरूप मिळाले आहे. घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून, बचत गटांच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठेशी जोडण्यासही मदत झाली आहे.








