spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपतींचे ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ जाहीर

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणार्या मानाच्या पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा येथील राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी पदावर कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गंगाधर रामचंद्र घुमरे यांना राष्ट्रपतींचे ‘गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक’ (MSS) जाहीर झाले आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे हे १९९१ च्या बॅचचे पोलीस अंमलदार आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी पोलीस स्टेशन पवनी, गोंदिया शहर आणि तुमसर येथे अत्यंत कार्यक्षमतेने सेवा बजावली आहे. सध्या ते राज्य गुप्तवार्ता विभाग, केंद्र भंडारा येथे आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

घुमरे यांनी आपल्या कार्यकाळात शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि मालमत्तेच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोठे कौशल्य दाखवले आहे. केवळ गुन्हेगारी नियंत्रणच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तीच्या काळातही त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. विशेषतः पुरपरिस्थिती दरम्यान त्यांनी अनेकांना सुरक्षित स्थळी हलवून मदतीचा हात दिला. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे.

त्यांच्या एकूणच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने २०२१ मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान पदक (DG Insignia) देऊन गौरविले होते. आता त्यांच्या प्रदीर्घ आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन २०२६ च्या प्रजासत्ताक दिनी त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

या यशाबद्दल त्यांचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Popular Articles