– विकासासाठी ताकद आमच्या मागे उभी- मंत्री बावनकुळे
– तुमचे एक चुकीचे मत म्हणजे रामटेक चा सत्यानाश
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील प्रचारसभांचा धडाका लावला आहे. शुक्रवार (दि.२८) नोव्हेंबर ला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपूर जिल्ह्यातील सुपर मार्केट रामटेक येथे जाहीर सभा झाली.
नगर परिषद रामटेकच्या निवडणुक २०२५ मधील भाजपा च्या उमेदवार ज्योतीताई कोल्हेपरा यांची ही निवडणुक १२४ योजनांची आहे, त्यांना निवडुन द्याल तर पाचही वर्ष रामटेक नगर परिषदेला निधी कमी पडु देणार नाही असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ तुमचे एक चुकीचे मत रामटेक चा सत्यानाश करेल ‘ असे नागरीकांना संबोधुन सांगितले. दरम्यान पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये महिला बचत गटांना मोठे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच आमची चार चाकांची गाडी असुन त्या चार चाकांमध्ये पहिले चाक पंतप्रधान मोदीजी, दुसरे चाक नितीन गडकरी, तिसरे चाक मुख्यमंत्री फडणवीस आणि चौथे चाक मी असे असून या गाडीमध्ये ज्योतीताईंसह निवडून आलेल्या भाजपाच्या उमेदवारांना घेऊन मोदीजींकडे न्यायचे आहे तेव्हा तुम्ही यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. लोकांसाठी सूर्यघर योजना सुद्धा अमलात आणायची आहे तसेच लोकांना मोफत प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विचार आमच्या विचाराधीन आहे. त्याचप्रमाणे शहरांमध्ये सीसीटीव्ही लावायचे असून ज्योतीताईंसह भाजपाच्या उमेदवारांना निवडून आल्यावर एक सुरक्षित रामटेक शहर करायचे आहे असेही पालकमंत्र्यांनी नागरिकांना सांगितले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, राजीव पोतदार, माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, भाजपा नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जु यादव, न.प. निवडणुक भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योतीताई कोल्हेपरा यांचेसह संजय मुलमुले, योगेश म्हात्रे व निवडणुकीत उभी असलेली भाजपाची उमेदवार मंडळी उपस्थित होती.




