सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील आमडी उड्डाणपुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने एका अनोळखी इसमाला जोरदार धडक देत चिरडून टाकले. धडक बसल्याने त्याचा देह गंभीर स्वरूपात विद्रुप झाला आहे. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांकडून माहितीनुसार, मृत व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, अधिकृतरित्या त्याची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा कर्मचारी तसेच रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे पाठविण्यात आला आहे. अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आले असून, रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांकडून महामार्गावरील जाणाऱ्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाची आणि चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.








