spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार- आ. सुधीर मुनगंटीवार

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेची संधी, हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्य

– दुर्गापूर येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवविचार, स्वराज्य आणि समाजएकतेचा संकल्प करण्याचे आ.मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पराक्रमी राजा नसून स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, नीतिमत्ता आणि रयतेच्या कल्याणाचा सर्वोच्च विचार आहेत. त्यांच्या नावाचा उच्चार होताच मनगटात १० हजार हत्तीचे बळ संचारते आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. हजारो सूर्यांचे तेज एका बाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे तेज एका बाजूला ठेवले, तरी शिवविचारांचे सामर्थ्य अधिक प्रभावी ठरते. जगात अनेक राजे झाले; मात्र रयतेसाठी राज्य करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दुर्गापूर येथे तिथीनुसार आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात केले.

यावेळी श्रीनिवास जंगमवार, हनुमान काकडे, रुद्रनारायण तिवारी, मनोज सिंघवी, नामदेव आसुटकर, शांताराम चौखे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेची संधी लाभणे, हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्य आहे.” या अत्यंत भावनिक शब्दांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविलेल्या ऐतिहासिक उपक्रमांची आठवण करून दिली. छत्रपती शिवरायांची सेवा ही पदाची नव्हे, तर आयुष्यभराची साधना असल्याचे सांगत त्यांनी शिवकार्याचा जागर प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून लाभलेल्या कार्यकाळात शिवकार्याला नवी उंची देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगताना त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णयांची आठवण करून दिली. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय, लंडनमधून शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे भारतात आणण्यासाठी पुढाकार, प्रतापगडावरील भवानी मातेला चांदीचे छत्र अर्पण करणे, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी अर्पण करणे, देशभरातील पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रेचे आयोजन करणे, गेटवे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविणे आणि राज्याभिषेक वर्षाचा विशेष लोगो शासनाच्या कामकाजात वापरण्याचा निर्णय हे सर्व शिवकार्याला वाहिलेल्या सेवाभावाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले, शिवविचार जनमानसात रुजावेत म्हणून मंत्रालयात दररोज ‘शिवविचार’ प्रसारित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. ‘जाणता राजा’ महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचविण्यात आले. शिवकालीन ‘होन’ तसेच शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात आली. शिवकालीन चलनावरील जनजागृती, कॉफी टेबल बुकची निर्मिती आणि पाकिस्तान सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेता आला, असे याप्रसंगी नमूद केले.

आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये, जिथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्याच ठिकाणी शिवजयंती उत्सव सुरू करण्यासाठी पुढाकार घेता आल्याचे समाधान व्यक्त करताना ते म्हणाले, “आज त्या दरबारात औरंगजेबाचा आवाज नाही, तर ‘जय भवानी… जय शिवाजी’चा जयघोष दुमदुमतो, यापेक्षा मोठा आनंद दुसरा असू शकत नाही.”

दुर्गापूर येथील चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या प्रतिमेसाठी दिलेला शब्द पूर्ण करण्याचे समाधान लाभले. या चौकातून जाणाऱ्या प्रत्येकाला शिवरायांचे दर्शन घडते आणि नवी ऊर्जा मिळते. शिवभक्तांनी परिसरातील सुविधांची मागणी केल्यानंतर चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत लोककल्याणकारी स्वराज्य उभे केले. त्याच विचारांवर चालत समाजात एकात्मता, स्वाभिमान आणि विकासाचा संकल्प करूया, असे आवाहन यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहीन,अशी ग्वाही देत त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.