spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डोंगर यावली येथे उप कार्यकारी अभियंत्याला नागरिकांनी धरले धारेवर ! 

– वाढीव वीज बिलांवरून डोंगर यावली दापोरी येथील नागरिक आक्रमक !

– महावितरणच्या निष्काळजी कारभारावर संताप ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यात वाढीव वीज बिलांचा प्रश्न आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला. हिवरखेड वीज वितरण केंद्रांतर्गत येणाऱ्या दापोरी, डोंगर यावली, सालबर्डी आणि घोडदेव परिसरातील नागरिकांनी डोंगर यावली येथे एकत्र येत महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना नागरिकांनी थेट जाब विचारत धारेवर धरले.

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात विजेचा सतत लपंडाव सुरू असून, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने येणारी वीज आणि वाढीव वीज बिले यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका थेट जनतेला बसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता वाघिले यांच्यासमोर महावितरणच्या अनेक त्रुटी आणि निष्काळजीपणाचा पाढा वाचला. अवाच्या सव्वा वाढीव वीज बिले, जीर्ण वीज वाहिन्या, वेळेवर दुरुस्ती न होणे, वारंवार होणारे फॉल्ट आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

“जनतेकडून नियमित वीज बिलाची वसुली केली जाते, मग नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा देण्याची जबाबदारी महावितरण का पार पाडत नाही?” असा संतप्त सवाल रुपेश वाळके यांनी उपस्थित केला. नागरिकांवर अन्याय करणारा कारभार तात्काळ सुधारला नाही, तर यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांचा संताप आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपकार्यकारी अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वीज वाहिनीवरील दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, केवळ आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नसून, प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरळीत झाला आणि वाढीव वीज बिलांचा प्रश्न मार्गी लागला तरच महावितरणच्या कामावर जनतेचा विश्वास बसेल, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. अन्यथा हिवरखेड वीज वितरण केंद्रासह महावितरणच्या कार्यालयांवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Popular Articles