– तपासणी साठी गेलेले निवडणूक पथक खाली हाताने परतले
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगर पालिका व एका नगर पंचायत निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू आहे. अशातच राजूरा शहरात शनिवारी, २२ नोव्हेंबर रोजी अनेकांना ट्रालीबॅगचे वितरण करण्यात येत असल्याची चित्रफीत व छायाचित्र समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
बॅग एका राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाच्या सोहळ्याचे औचित्य साधून वाटप केल्या जात असल्याची चर्चा राजुरा येथे रंगली आहे. राजूरा नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने राजूरा शहरात आदर्श आचारसहींता आहे. तरी देखील सर्रासपणे नागरिकांना ट्रालीबॅगचे खुलेआम वितरण करणे, हा आचारसहींतेचा भंग नाही का असा सवाल करीत या प्रकाराची तक्रार माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेकडे केली आहे. तर शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे.
राजूरा नगर पालिका निवडणूकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस, शेतकरी संघटना आघाडीत सरळ लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर आचारसहींतेचा भंग होईल असे कार्यक्रम घेण्यात येत असल्याची तक्रार माजी आमदार ॲड. वामनराव चटप व सुभाष धोटे यांनी केल्यानंतरही राजूरा शहरात ट्रॉली बँगचे वितरण करण्यात आले. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी ट्रॉली बँग नागरिकांना देत असल्याचे व्हीडीओ व छायाचित्र समाजमाध्यमावर काही जणांनी सार्वत्रिक केले.
त्यानंतर निवडणूक विभागाचे एक पथक तपासणीसाठी घटनास्थळी जावून आल्याचे बोलेल्या जात आहे. मात्र सदर पथक गेले तसे रिकाम्या हाताने परत आले. त्यामुळे आता राजूरा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आचारसहींता काळात राजूरा शहरात झालेल्या या घडामोडींनी आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूकीसाठी आमिष दिले जात असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात राजूरा पोलिसांना काहीही माहीती नसल्याचे हात वर केले. मात्र या बॅगची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.








