किशोर साहू, मौदा :- भोवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभात फेरी आणि विविध स्पर्धांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
संविधान दिनाचे औचित्य साधून गावातून भव्य ‘संविधान रॅली’ काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाशी निगडित विविध चित्रे आणि रांगोळ्या रेखाटल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो इयत्ता दुसरीचा विद्यार्थी शौर्य वैद्य .त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वेश परिधान केला होता , त्याच्या या वेशभूषेचे सर्वत्र कौतुक झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर आणि शाळेचे मुख्याध्यापक कु पठाण तब्बसूम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत साध्या आणि लहान मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत संविधानाचे महत्त्व व आपल्या हक्कांची माहिती स्पष्ट केली आणि याप्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे ,सेविका सेजल बावणे आणि शोभा बावणे यांनी विशेष परिश्रम घेतले.




