खापा :- गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चारगावजवळ एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नागपूर येथे दाखल केले. आंध्रप्रदेश येथील आदिलाबाद येथील रहिवासी विजय तुळजापुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील थोलेरू येथील रहिवासी भगवान कट्टा यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण काही कामासाठी नागपूरहून सिरोंजिला दुचाकी क्रमांक एम एच ४० सी झेड ९७६१ ने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार प्रकाश नांदुरकर यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तसेच हितज्योती आधार फाउंडेशनची टीम मदत करण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचली. स्थानिक विलास शेंडे आणि फाउंडेशनचे हितेश बनसोड, राजा फुले यांनी जखमींना रुग्णालयात तातडीने रुग्णालयात पोहचविले. बातमी लिहेपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.








