नागपूर :- नागपूरजवळील कामठीत दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी पहाटे कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पाकिस्तानातील काही व्यक्तींशी त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दोघेही कामठीत बराच काळ वास्तव्यास होते. त्यांच्यावर भारतविरोधी प्रचारात सहभागी असल्याचा संशय आहे. एटीएसकडून त्यांची कसून चौकशी सुरू असून गोपनीयता राखण्यासाठी त्यांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकजण स्थानिक उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. दोघांनाही मशिदीजवळून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वीची आठवण पुन्हा जागी झाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान नागपूरच्या कपिल नगर परिसरातील सुनीता जामगडे ही महिला आपल्या मुलासह कारगिलमधून एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेली होती. ऑनलाइन ओळख झालेल्या एका धर्मगुरूला भेटण्यासाठी तिने हा प्रवास केला होता. नंतर भारतीय सुरक्षा दलांनी तिला परत आणले.




