– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे येरखेडा नगरपंचायतीला स्पष्ट निर्देश; विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
कामठी :- येरखेडा नगरपंचायत क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील विकासकामांची गरज लक्षात घेता उपलब्ध शासकीय जागांचा योग्य व नियोजनबद्ध वापर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नगरपंचायतीने आपल्या हद्दीतील सर्व मोकळ्या शासकीय जागांची अचूक माहिती तातडीने संकलित करावी. शासकीय जागांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे नियमानुसार हटवून संबंधित जागा तात्काळ शासनाच्या ताब्यात घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
येरखेडा नगरपंचायत कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामे, उपलब्ध निधी, प्रलंबित कामे, पाणीपुरवठा व्यवस्था तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. विकासकामांना गती देताना नागरिकांच्या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
संरक्षित अतिक्रमणधारकांबाबत नियमानुसार कार्यवाही
शासकीय जागांवरील अतिक्रमणे हटविताना शासन निर्णयानुसार संरक्षण मिळालेल्या पात्र अतिक्रमणधारकांच्या प्रकरणांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. गोंडपुरा, सदाशिवनगर, मरटटोली, रविदासनगर तसेच बागडोर नाल्यावरील मोजणी न झालेल्या क्षेत्रांची तातडीने मोजणी करून पट्टेवाटपाच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शासकीय जागा अतिक्रमणमुक्त करून त्या जागांचा उपयोग नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, सार्वजनिक सुविधा तसेच अन्य विकासकामांसाठी करता यावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने आणि वेळबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
वाढत्या लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा सक्षम करा
येरखेडा परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कन्हान नदीवर आधारित विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी पडत असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. तसेच जलशुद्धीकरण केंद्राची विद्यमान क्षमताही भविष्यातील गरजांच्या तुलनेत अपुरी असल्याची माहिती देण्यात आली.
सध्या चार पाण्याच्या टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आणखी दोन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. नागरिकांना नियमित, पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
घरकुल व आयुष्मान योजनेच्या लाभापासून पात्र नागरिक वंचित राहू नयेत
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण वेळेत व्हावे, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनावश्यक विलंबाला सामोरे जावे लागू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तसेच ‘आयुष्मान भारत’ योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी विशेष आरोग्य कार्ड शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. शासनाच्या योजनांचा लाभ कागदोपत्री न राहता तो प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
विकासकामांना गती देण्याचे प्रशासनाला निर्देश
येरखेडा नगरपंचायत क्षेत्रातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, शासकीय जागा, पट्टेवाटप, घरकुल आणि विविध लोककल्याणकारी योजनांना गती देऊन नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रलंबित कामे अनावश्यकपणे रखडू नयेत, यासाठी संबंधित विभागांनी वेळबद्ध नियोजन करून कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
बैठकीस पदाधिकारी व अधिकारी उपस्थित
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, येरखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, उपाध्यक्ष रंजना काळे, गटनेते गजानन तिरपुडे, मुख्याधिकारी गौरव झेंडे, नगरसेवक मनीष कारेमोरे, नरेश मोहबे, आशिष वंजारी, ममता पिपरेवार, कल्याणी रामटेके, योगिनी खोब्रागडे, शीतल माथुरे, मनिषा गोंडाने, मंदा महल्ले, योगिता काळे, मनोज बडवाईक, इमरान, भाजप येरखेडा अध्यक्ष राकेश काळे, भाजप कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रम्हा काळे, राजश्री घिवले, सरिता भोयर, लतेश्वरी काळे, संदीप पोहेकर, दिलीप मुळे, प्रशांत काळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार गणेश जगडाळे तसेच विविध विभागांतील शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





