spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर-मोहाडी दुष्काळग्रस्त घोषित करा, बोनस व कर्जमाफी द्या; ७ ऑक्टोबरला हरदोली येथे ‘रास्ता रोको’चा इशारा!

– माजी उपसभापती अ. कलाम शेख यांच्या नेतृत्वात एसडीओ अंजली भोसले यांना शेतकऱ्यांचे निवेदन

हंसराज,तुमसर :-  तुमसर व मोहाडी तालुका त्वरित दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस व २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या ७ ऑक्टोबर रोजी तुमसर–बपेरा राज्य महामार्गावरील हरदोली (सि.) येथे तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अ. कलाम शेख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अंजली भोसले यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.

तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणासह विविध संकटांचा सामना करत आहेत. चालू हंगामात धान पिकावर मावा, तुडतुडा, करपा आणि खोडकिडा यांसारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. विशेषतः हलक्या धानाचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीतही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून तुमसर व मोहाडी तालुक्यांना वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शेतकऱ्यांचे हे संकट केवळ पिकापुरते मर्यादित नसून त्यांच्या संपूर्ण आर्थिक घडीवर आणि आगामी हंगामाच्या तयारीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने केवळ पोकळ आश्वासने न देता कालबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ७ ऑक्टोबर रोजी हरदोली येथे राज्य महामार्गावर चक्काजाम करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा अ. कलाम शेख व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत तहसीलदार, सिहोरा पोलीस ठाणे तसेच मुख्यमंत्र्यांकडेही पाठविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

– दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन तुमसर व मोहाडी तालुके तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावेत.

– किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी.

– निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार धान उत्पादकांना बोनस वितरित करावा.

– कर्जबाजारी शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी.

– नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर  राशी तात्काळ द्यावी.

Popular Articles