spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भोजापूर येथील जुन्या हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना; हातोडीने वार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

हंसराज,भंडारा/भोजापूर :- भंडारा जिल्ह्यातील भोजापूर येथील प्राचीन ‘पुराना हनुमान मंदिर’ देवस्थानच्या हनुमान मूर्तीची विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने मूर्तीच्या पायाजवळ हातोडीने वार करून दगड खरवडल्याचे निदर्शनास आले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात दिवसांत अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व संशयाचे वातावरण आहे.

ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी जेव्हा गावातील भाविक नेहमीप्रमाणे पूजा आणि दर्शनासाठी मंदिरात गेले, तेव्हा त्यांना मूर्तीच्या पायाजवळ काही भाग खरवडलेला दिसला. जवळून पाहणी केली असता, तिथे हातोडीने वार केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली.

आठवड्यापूर्वीही घडला होता संशयास्पद प्रकार ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बरोबर सात दिवसांपूर्वी असाच एक संशयास्पद प्रकार याच मंदिरात घडला होता. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मंदिरातील कलशामधले पाणी खाली ओतून दिले होते आणि त्या जागी स्वतःचा लोटा ठेवून त्यावर ‘दिवणाल’ (दिवा) मांडून ठेवला होता. त्यावेळी ही कोणाची तरी चूक किंवा अनावधानाने घडलेला प्रकार असावा, असे समजून भाविकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता थेट मूर्तीवरच प्रहार करण्यात आल्याने हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी आणि चौकशी सुरू केली आहे. खबरदारीचा उपाय आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये म्हणून पोलिसांनी मंदिराला आता कुलूप लावले आहेत. ही विटंबना नेमकी कोणी आणि कोणत्या हेतूने केली, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. “मूर्तीच्या पायाजवळ हातोडीने मारून दगड काढला गेला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर असून दोषींवर कडक कारवाई व्हावी,” अशी मागणी भोजापूरच्या ग्रामस्थांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.