– हिंगणा तालुक्यातील वेना नदीचे खोलीकरण, बंधारे व रिचार्ज शाफ्ट करण्याची मागणी !
– जल व मृदा जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री विपीनजी साखरकर यांची घेतली भेट !
हिंगणा :- एलनिनोचा प्रभाव आणि कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई स्थिती हाताळण्यासाठी शासनातर्फे नाला खोलिकरण, बंधारे दुरुस्ती, तलावांमधील गाळ काढणे यांसारखे जलसंधारणाची अनेक कामे प्रस्तावित असल्याची माहिती असून विहिरी, बोर यांसारख्या नवीन-जुन्या पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण व परिसर सुजलाम-सुफलाम होण्यासाठी नदयांना पुनर्जीवित करणे अत्यंत आवश्यक आहे.
पाणीटंचाई तसेच दुष्काळसदृश्य गंभीर विषयाचे अनुषंगाने तालुका हिंगणा परिसरातील वेणा नदी अनेक वर्षांपासून सर्व प्राणीमात्रांसाठी जीवनदायिनी असून शेतकरी, जनावरे व मनुष्यासाठी एकप्रकारे वरदानच ठरत होती. परंतु वर्षानुवर्षे वेणा नदीची दुरावस्था होत आहे, नदीपात्रात साचलेला गाळ-कचरा, आधुनिकीकरणांमुळे झालेले प्रदूषण, प्लास्टिक, दूषित केमिकल यामुळे एकेकाळी अमृतदाहिनी-जीवनदाहिनी म्हणविण्याऱ्या नदया आजच्या परिस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे आणि त्यामुळेच परिसरात पाणीटंचाई तसेच कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.
सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी वेणानदीचे पुनर्जीवन करण्यासाठी जल संवर्धनाकरिता खोलीकरण-रुंदीकरण करणे आवश्यक आहे. नदी पात्रात जलसंचयन करून परिसरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता वाढवता येऊ शकते तसेच भूजल पातळी वाढविण्याकरिता नदीपात्रात उपाययोजना म्हणून जलतारासदृश्य जलशोषखड्डे, रिचार्ज शाप्ट केल्यास भूमिगत जलस्त्रोतास बळकटीकरण होईल.
हिंगणा तालुक्यातील वेना नदीचे खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे-बॅरेज बांधकाम आणि रिचार्ज शाफ्ट केल्यास मंगरूळ, खैरीपन्नासे, संगम, हिंगणा, रायपूर, सुकळी (गुपचूप), खडका, सुमठाणा, कोतेवाडा, शिवमडका, गुमगांव, धानोली(गुम), वागदरा, कान्होली, वडगांव (गुजर), देवळी(पेठ), शिरूळ, किरमिटी, भारकस, तुर्रकमारी, किन्ही, चिंचघाट, सातगाव, सुकळी(बेलदार), बुटीबोरी इत्यादी गांवाना प्रत्यक्ष व सदर गावांच्या आजूबाजूची सर्व गावे जलयुक्त व लगतच्या जलस्रोतांचे बळकटीकरण होईल आणि पाणी टंचाईच्या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण होईल असे मत कोतेवाडाचे सरपंच तथा हिंगणा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवेन्द्र आष्टणकर यांनी व्यक्त केले आहे .
एलनिनोचा प्रभाव व पाणीटंचाईच्या उपाययोजनेमध्ये ईतर कामांप्रमाणे नद्यांना पुनर्जीवित करण्याच्या कामांवर शासनाने प्राधान्य दिल्यास भविष्यात पाणीटंचाई तसेच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही.
म्हणूनच तालुका सरपंच संघटनेतर्फे हिंगणा हद्दीतील सर्व ग्राम पंचायती परिसरातील पाणीटंचाई तसेच दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी 1)नदी पुनर्जीवनाकरिता डोहसदृश खोलीकरण-रुंदीकरण, 2) जलसंचयाकरिता आवश्यक ठिकाणी बंधारे/बॅरेज बांधकाम आणि 3) भूजल पातळी वाढविण्याकरिता नदीपात्रात उपाययोजना म्हणून जलशोषखड्डे रिचार्ज शाफ्ट इत्यादी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात व प्रशासकीय प्रस्तावात मान्यता मिळावी याकरिता संघटनेचे तालुका अध्यक्ष देवेन्द्र आष्टणकर यांनी कार्यकारी अभियंता जलसंधारण विभागाचे श्री विपिनजी साखरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.






